राज्य शासनाने शुक्रवारपासून सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. त्यासंदर्भात संबंधितावर दंडासह कठोर कारवाईचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या चार पथकांनी कोल्हापूर शहरात फिरती करून कारवाईचा प्रयत्न केला. परंतु सिंगल यूज प्लास्टिक बघायलासुद्धा मिळाले नाही! दरम्यान, कारवाईविषयी विचारणा होऊ लागल्यावर महापालिकेने रात्री भाऊसिंगजी रोडवरील एका व्यापाऱ्यावर कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल केला.
प्लास्टिकच्या कांड्यासह फुग्यासाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, सजावटीचे प्लास्टिक व थर्माकोल, प्लेटस्, कप, ग्लासेस, कटलरी, स्ट्रॉ, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटाभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग), कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या ओव्हन बॅग्ज, सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन यात डिश, बाऊल, कंटेनर (डबे) आदींवर बंदी आहे.
महापालिका प्रशासनाने वरील बंदी असलेल्या सर्वांविषयी कारवाई करण्यासाठी चार पथके तैनात केली आहेत. एका पथकात तीन आरोग्य निरीक्षक, तीन मुकादम व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चारही पथके दिवसभर ठिकठिकाणी फिरली. परंतु रात्रीपर्यंत एकाही ठिकाणी वरील बंदी असलेल्या वस्तू आढळल्या नाहीत.