2019 च्या निवडणुकीत ‘तेल लावलेला पहिलवान’ हा शब्द कमालीचा चर्चेत आला होता. यामध्ये दिग्ग्ज नेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात कमालीचा संघर्ष झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. ही कुस्तीगीर परिषद महाराष्ट्रातील सरकार कोसळल्यानंतर बरखास्त करण्यात आली आहे.
ही कारवाई भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या विरोधात गेल्या काही वर्षापासून आजी-माजी मल्ल तक्रार करत आहेत. या विरोधात पुणे जिल्हा कुस्ती संघटना आघाडीवर होती. त्यांनी राज्य कुस्ती परिषदेच्या जमा खर्चावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते आणि काही गंभीर आरोपही केले होते.
कुस्तीगीर परिषदेने जमा खर्चाच्या मागणीवर कसलंही उत्तर दिलं नव्हतं. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका कंपनीचे प्रायोजकत्व स्विकारले गेले त्यावरही अनेक कुस्ती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या कंपनीसोबत झालेला करारनामा देखील कुस्तीगीर परिषदेने लपवला होता.
या स्पर्धेसाठी परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी राज्य सरकारकडून 43 लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. असं असताना याची कल्पना कोणालाही देण्यात आली नव्ह्ती. परिषदेच्या कामकाजा बरोबर सचिव बाळासाहेब लांडगे यांनी वयाच्या ८४व्या वर्षी काम करणे, त्याचा मुलगा ललित लांडगे यांना कार्यालीन सचिव नियुक्त करणे याबाबत कुस्ती जाणकारांनी कमालीची नाराजी दर्शवली होती. शरद पवारांनी याबाबत आदेश देऊनही बाळासाहेब लांडगे यांनी मनमानी कारभार चालू ठेवल्याने याविरोधात तक्रार करण्यात आली आणि त्याचीच प्रचिती म्हणजे कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.