Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : रेल्वेने निवडला 'भुयारी'चा आराखडा

कोल्हापूर : रेल्वेने निवडला ‘भुयारी’चा आराखडा

परीख पुलाजवळील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने पाठवलेल्या दोन आराखड्यांपैकी भुयारी मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाने निवडला आहे. त्या आराखड्यावर पुढील काम करण्यासाठी रेल्वेकडून कन्सल्टंट नेमण्यात येणार आहे.

त्याच्याकडून विस्तृत आराखडाही तयार केला जाईल. त्याचा अंदाजित खर्च काढला जाईल. यासाठी १० लाख रुपये भरण्याचे पत्र महापालिकेला पाठवले आहे. यामुळे आर्किटेक्ट असोसिएशनने सादर केलेला जुन्या परीख पुलाच्या रुंदीकरणाचा आराखडा पाठीमागे पडला आहे.

सध्या अस्तित्वात असलेला परीख पूल जुना झाला आहे. पावसात पाणी साठून रस्ता बंद होतो. या रस्त्यावर विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह वर्दळ असते. जुना पूल धोकादायक झाल्याने शहरातील विविध व्यावसायिक एकत्र येऊन पूल नूतनीकरणाची चळवळ चालवली होती. त्यातून तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेतली. त्यावेळी आराखडे सादर करा, असे महापालिकेला रेल्वेने सांगितले होते. महापालिकेने भुयारी मार्गाचा तसेच रुंदीकरण व नूतनीकरण असे दोन आराखडे सादर केले होते. त्यानंतर दोन्ही आराखड्यांचा अभ्यास करून रेल्वेने भुयारी मार्गाचा पर्याय निवडला आहे. या पर्यायानुसार आता पुढील आराखडा रेल्वेकडून केले जाणार आहे. त्यासाठी कन्सल्टंट नेमून पुढील काम केले जाणार आहे.

महालक्ष्मी चेंबरपासून भुयारी मार्ग सुरू करून तो शहाजी लॉ कॉलेजजवळील चौकाच्या अलीकडे काढला जाणार आहे. यासाठी किती खर्च होईल, याचा अंदाजित खर्च कन्सल्टंटकडून तयार करून घेतला जाईल. त्यानंतर निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. जुना पूल पाणी काढण्याच्या सोयीसाठी असल्याने त्यात काही रेल्वे नवीन करेल, असे वाटत नाही.

रेल्वेने एक नंबर फाटकचा रस्ता बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने पादचारी पुलासाठी (एफओबी) आराखडा दिला होता. त्यावेळी पैसे भरले आहेत. आता भुयारी मार्ग होणार असेल तर एफओबी रद्द करून ते पैसे तिकडे वळवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
भुयारी मार्गाचा सविस्तर आराखडा बनवण्यासाठी व त्याची फिजीबिलिटी तपासण्यासाठी कन्सल्टंट नेमण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेने पत्र दिले असून, १० लाख भरण्यास सांगितले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -