जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप सुरू होती. धरण परिसरातील पावसाचा जोर कमी झाला आहे. वातावरण ढगाळ व हवेत गारवा आहे. कोयना, चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. सांगलीत पाणीपातळी 19.5 फुटापर्यंत आहे.
जिल्ह्यात गेली दहा-बारा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज पावसाने काहीशी उघडीप दिली. पश्चिम भागातील शिराळा, वाळवा तालुक्यात हलक्या सरी पडल्या. पलूस, कडेगाव, मिरज, सांगलीत रिमझिम होत होती. अधूनमधून सूर्यदर्शन झाले. कवठेमहांकाळ तालुक्यात 11.5 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.9 मि.मी. पाऊस पडला. जिल्ह्यात मागील 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज-4.7 (158.8), जत-8.6 (137.4), खानापूर-विटा-5.2 (156.1), वाळवा-इस्लामपूर-3.5 (210.9), तासगाव-1.4(139.4), शिराळा-7.2 (516.8), आटपाडी-0.1(95.2), कवठेमहांकाळ-11.5 (144.5), पलूस-2.2 (128.2), कडेगाव-2.3 (165.3).
धरण परिसरातील सुरू असणारी अतिवृष्टीही कमी झाली आहे. तेथे मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. मागील 24 तासात म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते सोमवार सकाळी आठवाजेपर्यंत कोयना येथे 47 तर सोमवारी दिवसभरात 9 मिमी पाऊस पडला. महाबळेश्वर येथेही वरीलप्रमाणे अनुक्रमे 66 व 26 मिमी पावसाची नोंद झाली. नवजाला 94 व 28 मिमी पाऊस कोसळला. धोम येथे 10 व 1, कण्हेरला 7 व 3 तर चांदोलीत 24 व 2 मिमी पाऊस पडला. यामुळे धरणांत पाण्याची आवक काही प्रमाणात घटली आहे. कोयनात प्रतिसेंकद अंदाजे 26 हजार क्युसेक पाणी येत आहे. धोम, कण्हेरमध्ये सुमारे दोन हजार तर चांदोलीत 8 हजार क्युसेक पाणी येत आहे. कोयना धरण सध्या 58.45 टीएमसी भरले आहे. या धरणातून 2100 क्युसेक पाणी सोडणे कायम आहे. धोम धरण 8 टीएमसी भरले आहे. कण्हेरमध्ये 6.51 टीएमसी साठा झाला आहे. चांदोली धरण 25.63 टीएमसी भरले आहे. या धरणातून 1858 क्युसेक पाणी प्रतिसेंकद वारणा नदीत सोडले जात आहे.