मिरजेतील मंगळवार पेठ येथे इसापुरे- गल्ली परिसरात राहणारे राजेंद्र बंडोपंत साळुंखे (वय ५०) यांचा अंकली फाट्याजवळ चारचाकी वाहनाने ठोकरल्याने अपघातात मृत्यू झाला. या घटनेत राजेंद्र यांच्या पत्नी दिपाली यांनाही जबर मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची नोंद सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पोलिसांनी कार चालक महेश अशोक माळी यास कारसह ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, राजेंद्र साळुंखे हे नाभिक समाजाचे असून आज नागपंचमीमुळे दुकान बंद होते. त्यामुळे लहान मुलगा रोहित याला भेटण्यासाठी ते पत्नी सोबत सकाळी 10 च्या दरम्यान (एम.एच.१०सी.एन. ३७०६) हे आपले दुचाकी वाहन घेऊन इचलकरंजीला निघाले होते. अंकली फाट्याजवळ विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेजच्याजवळ आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एम.एच.१० सी.एक्स ८३०६) या क्रमांकाच्या आय-20 कारने साळुंखे यांच्या मोटरसायकलीच्या डिकीला धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, राजेंद्र साळुंखे हे दूरवर फेकले गेले. डोकीला जबर मार लागल्याने व रक्तस्त्राव झाल्याने साळुंखे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी दीपाली याही जबर जखमी झाल्या. राजेंद्र साळुंखे यांच्या पत्नी दीपाली यांनी पती रस्त्यावर पडल्याचे पाहून एकच हंबरडा फोडला.
परिसरातील नागरीकांनी १०८ रूग्णवाहिका बोलावून घेवून दोघांनाही तात्काळ सांगली शासकीय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी राजेंद्र साळुंखे हे मृत असल्याचे सांगितले व दीपाली साळुंखे यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. सांगली ग्रामीण पोलिसांनी अपघातातील गाडीचा शोध घेवून मृत्यूस कारणीभूत असलेली (एम.एच.१०सी.एक्स- ८३००) आय-२० कार व चालक महेश अशोक माळी (रा.वासुंबे ता.तासगाव) यास ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद सांगली ग्रामीण पोलिसात झाली आहे.