शेती परवडत नाही म्हणून झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहे. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता बाळगली जाते. मिरज तालुक्यात अनेक गावांमध्ये ऊस, द्राक्षे आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यातच मिरज तालुक्यातील शिपुर गावामधील एका पट्टयाने चक्क उसामध्ये गांजा लागवड केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शिपुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून गांजा जप्त केल्यानंतर तालुक्यातील गांजाची चोरी शेती पुन्हा चर्चेत आली आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, शिपुर-खंडेराजुरी रोड येथील पोटकॅनॉल जवळील शेतीमध्ये नंदकुमार दिनकर बाबर या पट्टयाने चक्क तीस गुंठ्यांत झाडांची गांजा पिकाची लागवड केल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथकासह बाबर यांच्या शेतात धाड टाकली आहे.
यावेळी उसाच्या शेतात ठराविक अंतरावर जवळपास अंदाजे ४०० ते ५०० गांजाची रोपे ३-४ फूट वाढलेली आढळून आलेली आहेत. ही सर्व रोपे जप्त करण्यात आली आहेत. पुढील अधिक तपास ए. एस. कोळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या पथकासह शिपूर गावचे पोलीस पाटील तसेच मिरज ग्रामीण पोलीस यांनी ही सहभाग घेतला आहे.