भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसरा सामना आज (ता. 23) सायंकाळी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे.
नागपूरमधील दुसरा टी-20 सामना जिंकणे भारतीय संघासाठी महत्वाचा आहे, अन्यथा मालिका गमावण्याची नामुष्की टीम इंडियावर येऊ शकते. मात्र, आता हा सामनाच अडचणीत आला आहे. नागपुरमधील दुसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट असून, त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सामन्याच्या दिवशीही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज (शुक्रवारी) होणारा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना अडचणीत आला आहे..
टीम इंडिया व ऑस्ट्रेलियाचे संघ बुधवारीच (ता. 21) नागपुरात दाखल झाले होते. गुरुवारी (ता. 22) पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर दाट ढग दाटून आले होते. पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघालाही दुपारी व संध्याकाळी नियोजित सराव सत्र रद्द करावे लागले होते.
दरम्यान, सामन्याच्या दिवशीही म्हणजे, आजही नागपुरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी नाराज झाले आहेत. सुमारे 45,000 क्षमतेच्या स्टेडियमवरील सामन्याची तिकिटे आधीच विकली गेली आहेत. मात्र, हा सामना झाला नाही, तर चाहत्यांना तिकिटाचे पैसे परत करावे लागणार आहेत.
प्लेईंग-11 मध्ये होणार बदल
दरम्यान, मोहालीच्या मैदानात 208 धावांचा बचावही भारतीय बाॅलर्सना करता आला नव्हता. त्यामुळे या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल केले जाण्याची शक्यता आहे. पाठीच्या दुखण्यातून सावरत असलेला जसप्रित बुमराह या मॅचमध्ये खेळण्याची शक्यता आहे.
बुमराहचा संघात समावेश झाल्यास, उमेश यादवला बाहेर बसावे लागेल. शिवाय, गेल्या काही सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी रविचंद्रन अश्विनला संधी दिली जाऊ शकते. पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिकला संधी मिळाली, पण फलंदाजीत, तसेच विकेटमागेही तो चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे.