ताजी बातमी ऑनलाईन टीम
उद्या नवरात्रीला प्रारंभ : अंबाबाईच्या दर्शनास 20 ते 25 लाख भाविक येण्याची शक्यता : जोतिबाचा 2 रोजी तर करवीर अंबाबाईचा 3 रोजी जागर, 5 ऑक्टोबरला शाही दसरा
हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असलेल्या आणि नवदुर्गांची उपासना करण्याची भावना जनमाणसांच्या मनामनामत रुजवणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाला सोमवार 26 रोजीपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी, जोतिबा, वाडीतील दत्तात्रय यांच्यासह जिह्यातील सर्व देवतांच्या मंदिरे उत्सव साजरा करण्यासाठी सर्व बाजूंनी सज्ज झाला आहे. देवदेवतांच्या दर्शनास परराज्यातून 20 ते 25 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने यात्रीनिवास व हॉटेल्सही तुडूंब भरून जाणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही निर्बंध नसल्याने शहरासह जिह्यातील मंडळांकडून उत्सवाच्या पहिल्याच दिवसांपासून रासदांडिया, भाव व भक्तीगीतांच्या कार्यक्रमांसह भजन, किर्तन, प्रवचनांचे आयोजन केले जाणार आहे.
अशा सगळ्या वातावरणातच उत्सवाच्या पाचव्या माळेला म्हणजेच शुक्रवारी (दि. 30) ललिता पंचमीचा सोहळा साजरा केला जाईल. टेंबलाई टेकडीवरील टेंबलाई मंदिरातील कोहळा पूजनाचा विधीही तर पूर्णपणे निबंधमुक्त केला जाणार आहे. कोहळा पुजन विधीसाठी करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजा भवानी व गुरु महाराजांची पालखी गतवर्षाप्रमाणे वाहनातून नव्हे तर पायी टेंबलाई टेकडीवर दाखल होणार आहेत. रविवारी 2 रोजी जोतिबाचा तर सोमवार 3 रोजी अंबाबाईचा जागर केला होईल. याचबरोबर 5 ऑक्टोबर विजया दशमीचा सोहळा साजरा होईल. ऐतिहासिक दसरा चौकात सायंकाळी गोरज मुहूर्तावर साजरा केल्या जाणाऱ्या शाही दसऱ्यातून सोनंही लुटलं जाईल.