ताजी बातमी ऑनलाईन टीम
लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. आज जर या प्रवाशांनी घराबाहेर पडण्याचा आणि लोकलने प्रवास करण्याचा विचार केला असेल तर त्यांनी जरा थांबावे. कारण आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे नाही तर त्यांना प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो.
हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गाच्या ठाणे-कल्याण अप आणि डाऊन लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्गाच्या कुर्ला – वाशीदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल विलंबाने धावतील.
आज मध्य रेल्वे मार्गाच्या ठाणे-कल्याण अप आणि डाऊन तसेच जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन-जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने स्थानकावर पोहोचतील. तर, कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निश्चित स्थानकावर 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.






