अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांना अखेर उमेदवारी मिळाली आहे. आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी मिळाल्यामुळे आज ऋतुजा लटके अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज करण्यासाठी महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी महाविकासआघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार तयारी सुरु झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही (Congress-NCP Leaders) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऋतुजा लटके यांच्यासोबत जाणार आहे.
गुंदवली मनपा येथे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गणेश मंदिर, मालपा डोंगरी इथून साडेनऊ वाजता फेरीला सुरूवात होणार आहे. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋतुजा लटके याच्यासाठी महाविकासआघाडीचे सात नेते शक्तीप्रदर्शन करणार आहे. अर्ज भरण्यासाठी जाताना ऋतुजा लटके यांच्यासोबत हे नेते जाणार आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिलीप वळसे-पाटील, भाई जगताप, सुरेश शेट्टी, अनिल परब, अनिल देसाई हे महाविकासआघाडीचे नेते हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा मार्ग मोकळा झाला असताना ऋतुजा लटके सकाळी 8 वाजता अंधेरीच्या राहत्या घरातून निघाल्या. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या कार्यालयात जाऊन ऋतुजा लटके यांनी रमेश लटके यांच्या प्रतिमेला हार घातला. तसंच रमेश लटके यांच्या कार्यालयाला फुलांचे तोरण बांधण्यात आले. ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरणार असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.