करवीर निवासीनी श्री. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधील साहित्य चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या मदतीने अवघ्या दहा मिनिटात या महिलांना मुद्देमालासहित रंगेहात पकडण्यात आले. भक्ताच्या तक्रारीनुसार पाहणी केले असता दोन महिला चोरी करताना निदर्शनास आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाबाई मंदिरात आज सकाळी 10 वाजता दर्शन रांगेत चोरी करणाऱ्या दोन महिलांनी मंदिराकडे तोंड करून उभ्या असणाऱ्या महिलेच्या पर्सवर ओढणी टाकून त्यातील मुद्देमाल लंपास केला. चोरी झाल्याची घटना काही काळाने निदर्शनास आली. यावेळी तेथील काही भक्तांनी याबाबत देवस्थान समितीकडे तक्रार केली.त्यानुसार सीसीटीव्ही तपासले असता चोरीचा उलघडा अवघ्या दहा मिनिटात झाला.
यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मंदिर पोलिस इन्चार्ज राजेंद्र कांबळे, महिला पोलीस सहाय्यक फौजदार नंदिनी मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल देवानंद बल्लारी, देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप, अवधूत चौगुले, अनिकेत बागल व सिक्युरिटी रोहित आवळे,गोसावी यांच्या साह्याने सदर गुन्हा उलगडण्यात मदत झाली.