ताजी बातमी ऑनलाईन टीम
महामार्गाचे रेंगाळलेले काम, पावसामुळे पडलेले खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हातकणंगले परिसरात आज प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. महामार्गाच्या दुतर्फा तब्बल दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सांगली-कोल्हापूर मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. रेल्वे मार्गावर वाटेल तसे खोदकाम करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर रोजच वाहतूककोंडी होत आहे. हातकणंगलेजवळील रामलिंग फाटा ते तारदाळ फाटय़ापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक मंदगतीने सुरू असते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
पावसामुळे शनिवारी रस्त्यावर पाणी आल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. रुग्णवाहिका, विद्यार्थी वाहतूक बस जागच्या जागी थांबून होत्या. पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमुळेही या वाहतूककोंडीत भर पडली होती.