ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुरवठा विभागाची माहिती : पहिल्या दिवशी कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह हातकणंगले, कागल तालुक्यातील कार्डधारकांना वितरण : उद्या उर्वरीत तालुक्यातील कार्डधारकांना वितरण
दिवाळी सणानिमित्त राज्य सरकारने अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांसाठी 100 रुपयात प्रत्येकी एक किलो प्रमाणात साखर, रवा, चणाडाळ व पामतेल या शिधावस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बहुतांश वस्तू जिह्यातील गोदामात दाखल झाल्या आहेत. आज, शुक्रवारपासून कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह कागल व हातकणंगले तालुक्यातील कार्डधारकांना त्याचे वाटप होणार आहे. तर उद्या, शनिवारपासून उर्वरीत तालुक्यातील कार्डधारकांना वस्तूंचे वाटप होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
राज्य सरकारने एक महिन्यासाठी रेशनकार्डधारकांकरीता चार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिवाळी दोनच दिवसांवर येऊनही अद्याप या वस्तू न मिळाल्याने रेशन ग्राहकांमधून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधण्यात आला. यावर जिह्यातील सुमारे साडे पाच लाख रेशन कार्डधारकांना दिवाळीनिमित्त शिधा वस्तूंच्या पॅकेजचे वाटप करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. यातील बहुतांश वस्तू जिह्यातील गोदामांमध्ये आल्या आहेत, काही ठिकाणी काही वस्तू येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या वस्तूंचे जिह्यात दोन टप्प्यात वाटप सुरु करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर, कागल व हातकणंगले तालुक्यातील रेशन दुकानांसाठी या शिधा वस्तू गुरुवारीच गोदामांमधून पाठविल्या जाणार आहेत. त्याचे वितरण आज, शनिवारपासून कार्डधारकांना होणार आहे. तसेच उर्वरीत शाहुवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शिरोळ या तालुक्यांमधील रेशन दुकानांमध्ये गुरुवार व आज, शुक्रवारपर्यंत या वस्तू गोदामांमधून पाठविण्यात येणार आहे. त्याचे वाटप उद्या, शनिवारपासून रेशनदुकानांमधून कार्डधारकांना केले जाणार आहे, असे सांगण्यात आले.