रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं, की ते लवकरच डिजिटल रुपया लाॅंच करणार आहेत. त्यानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी डिजिटल रुपया बाजारात दाखल झाला आहे. अर्थात, हे काही भौतिक चलन नाही, तर तुमचे पैसे डिजिटल रुपात असतील, त्यामुळे ते खिशात बाळगण्याची गरज नाही..
सध्या प्रायोगिक तत्वावर डिजिटल करन्सी (Digital Currency) सुरु करण्यात आली आहे. त्यात 9 बँकांचा समावेश असेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा (बीओबी), युनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी बँक यांचा त्यात समावेश असणार आहे.
डिजिटल करन्सीचे फायदे
‘आरबीआय’च्या मते, डिजिटल करन्सीमुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. पेमेंट सिस्टम अधिक कार्यक्षम होईल व मनी लाँडरिंगसारख्या प्रकारास आळा बसेल. सरकारी रोख्यांच्या सेटलमेंटसाठी डिजिटल चलनाचा वापर केला जाणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेनं म्हटलं आहे.
डिजिटल करन्सीमुळे रोख पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही. डिजिटल चलन मोबाईल वॉलेटमध्ये ठेवू शकता. डिजिटल चलनावर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण असेल. डिजिटल चलनामुळे सरकारसोबतच्या व्यवसायासाठीच्या व्यवहारांची किंमत कमी होणार असल्याचे सांगितले जाते.
नोटांचे काय होणार..?
डिजिटल चलन आल्याने चलनी नोटांचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, सध्याच्या चलनी नोटांवर काहीही परिणाम होणार नाही. चलनी नोटांची व्यवस्था संपवण्यासाठी डिजिटल रुपया लाँच केलेला नाही. उलट, डिजिटल चलनामुळे लोकांना आर्थिक व्यवहारासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
चलनी नोटा आणि डिजिटल चलन, अशा दोन्ही प्रणाली सुरु राहतील. डिजिटल रुपया अशा प्रकारे आणला जाईल, की इंटरनेटशिवाय पेमेंट करता येईल. शिवाय बँकेत खाते नसणाऱ्यांनाही त्याचा वापर करता येणार आहे. त्यामुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे सांगितले जात आहे.