कोल्हापुरात ऊस दराच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दत्त दालमिया सहकारी साखर कारखान्याकडे वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवण्यात आला आहे. शिये -भुये रस्त्यावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवल्याची घटना समोर आली आहे. गेल्या गळीत हंगामातील वाढीव दरासह एकरकमी एफआरपी साठी गेल्या आठवड्याभरापासून जय शिवराय संघटनेच कारखान्याच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू आहे.
दरम्यान ट्रॅक्टर पेटवल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची चर्चा परिसरात आहे.
ऊस उत्पादकांना दोन टप्प्यातील एफआरपी देण्याऐवजी एकरकमी एफआरपी द्यावी.यासाठीचा कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा.तसेच,एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करावी, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात १७ व १८ रोजी सलग दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक,माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
साखरेची किमान विक्री किंमत ३१ वरून ३५ रुपये करणे आवश्यक आहे.तसेच इथेनॉल निर्मिती खर्च वजा करून राहणाऱ्या रकमेतील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, सर्व प्रकारच्या इथेनॉलमध्ये प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी,खुल्या साखर निर्यात धोरणांतर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी,आदी प्रमुख मागण्यांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान काल रात्री ट्रॅक्टर पेटवल्यामुळे पुढील आंदोलन कोणते रूप धारण करणार याची चर्चा सर्वसामान्यात रंगली आहे.