ताजी बातमी ऑनलाईन टीम
काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर केलंय. काँग्रसने या घोषणापत्रात सर्वसामान्य जनता,महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनं दिली आहेत. मात्र यापेक्षा काँग्रेसच्या एका आश्वसनाची जोरदार चर्चा होतेय. जर आम्ही सत्तेत आलो तर नरेंद्र मोदी स्टेडियमचं नाव बदलू, असं आश्वासन काँग्रेसने दिलंय.
सरकारी नोकऱ्या देण्यात येतील. तरुणांना 3 हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्यात येईल. घरगुती वापरासाठीचा सिलेंडर 300 रुपयात देण्यात येईल. 300 यूनिट वीज मोफत दिली जाईल. जुनी पेन्शन योजना सुरु करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक नागरिकाला 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील. शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच वीज बिल माफ केलं जाईल, असे अनेक आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.
गुजरातमधील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर देण्यासाठी भाव निर्धारण समिती स्थापित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. गरजू विद्यार्थ्यांना 5 ते 20 हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.
दुध उत्पादकांना अनुदान
याशिवाय गुजरात काँग्रेसने दुध उत्पादकांना प्रति लीटर 5 रुपयांचं अनुदान देणार असल्याचं म्हटलंय. तसेच 4 लाख रुपयांचा करोना भरपाई दिली जाईल. राज्यात 27 वर्षात झालेल्या गैरकारभारांची चौकशी होईल. अॅन्टी करप्शन एक्ट आणला जाईल, असे अनेक आश्वासनं काँग्रेसने दिले आहेत.
गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी 2 टप्प्यात निवडणूक होणार असल्याचं निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मतदान 1 आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे गुजरात आपला गड राखणार की सत्तांतर होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.