Monday, December 23, 2024
Homeक्रीडाRohit Sharma चे कर्णधारपद धोक्यात? टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवामुळे बीसीसीआय नाराज

Rohit Sharma चे कर्णधारपद धोक्यात? टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवामुळे बीसीसीआय नाराज

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ टी-20 मधील 15 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. पण तिथे त्यांना सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. आयसीसीच्या या स्पर्धेत रोहित शर्मा पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत होता. भारताच्या या अनुभवी फलंदाजाने आयपीएलमध्ये (IPL) अनेकदा आपल्या संघाला यश मिळवून दिले असले तरी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात तो टीम इंडियासाठी (Team India) अपयशी ठरला. मात्र आता हा पराभव बीसीसीआयला (BCCI) चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण बीसीसीआयकडून संपूर्ण निवड समिती बरखास्त करण्यात आली आहे. वन डे आणि टेस्टसाठी दोन वेगवेगळे कर्णधार निवडले जाणार अशी प्लॅनिंग बीसीसीआयकडून केली जात आहे. दरम्यान वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करु न शकल्यामुळे रोहित शर्माची कॅप्टनसी देखील धोक्यात आली आहे.

सलग दुसऱ्या वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटने पराभव
रोहित शर्माच्या संघाला टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. यापूर्वी, गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाला होता. या दोन्ही पराभवांमुळे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निवड समितीला मोठा फटका बसला. 2021 मध्ये संघाचा कर्णधार विराट कोहली होता, तर या पराभवानंतर त्याची कर्णधार म्हणून सेवा संपली होती.

कॅप्टनसी आणि बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरला रोहित
2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा स्थितीत रोहित शर्मा यावेळी विजेतेपदाचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा सर्वांनाच होती. पण रोहित आयसीसी नॉकआऊट सामन्यांमध्ये टीम इंडियाचा निराशाजनक रेकॉर्ड सुधारू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यातही रोहित चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. संपूर्ण स्पर्धेत त्याची फलंदाजी खराब राहिली आणि त्याने सहा सामन्यांत 19.33 च्या सरासरीने 116 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 106.42 होता, जो खूप वाईट म्हणता येईल.

कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्या पहिल्या क्रमांकावर
हार्दिक पांड्या हा लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने अनेक वेळा हे सिद्ध केले आहे. त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर पांड्याने 79 सामन्यात 1117 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 146.39 राहिला आहे. हार्दिकने आपल्या मध्यमगती गोलंदाजीने 62 विकेट्सही घेतल्या आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडूने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला आयपीएलच्या 15 व्या एडिशनमध्ये चॅम्पियन बनवले होते. 29 वर्षीय हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने पदार्पणाच्या वर्षीच विजेतेपद पटकावून इतिहास रचला. त्याने आपल्या कर्णधार कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. हार्दिक सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. अशा स्थितीत हार्दिककडे पुढील टी-20 वर्ल्ड कपसाठी कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -