राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजेपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. साखर कारखाना प्रकरणात ईडीने मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरावर छापेमारी केली.त्याचबरोबत इडीकडून पुण्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली आहे. चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागिदार असल्याचं बोललं जात आहे. मात्र चंद्रकांत गायकवाड हे माझे भागीदार नाहीत, तसेच माझ्या जावयाचा देखील या कंपनीशी काहीही संबंध नाही असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय म्हटलं मुश्रीफ यांनी? मुश्रीफ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. ईडीने ज्या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वर छापे टाकले त्या कंपनीशी माझा किंवा माझ्या जावायाचा काहीही संबंध नाही.
चंद्रकांत गायकवाड हे माझे भागीदार नाहीत. साखर कारखाना कंपनी चालवत नाही. साखर कारखान्यात शेतकऱ्यांचा पैसा असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
कशाबद्दल ईडी छापे घालत आहे, ते माहिती नाही. कशामुळे हे सर्व चालू आहे हे माहिती नाही. अद्याप याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झालेली नाही. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार. यामध्ये अधिकाऱ्यांची काहीच चूक नाही, त्यांना वरून आदेश आले आहेत. कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.