केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील प्रथमच अॅक्शन मोडवर आलेले दिसत आहे. शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या महत्त्वाची बैठक शिंदे यांनी बोलाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तर आज एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी विधीमंडळातील शिवसेना कार्यालयातवर ताबा घेतला. तसेच मंत्रालयाबाहेरील शिवालय हे कार्यालयही ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
कुठे होणार बैठक?
उद्या म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील ताज प्रेसेंडेंट येथे ही बैठक संपन्न होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी ,खासदार,आमदार उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांची बैठक
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत राज्यभरातील जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली होती. शिंदे गटाच्या शिवसेनेने व्हिप जारी केला तरी तो कुणीही पाळणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी या विषयावर चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
निवडणूक आयोग बरखास्तीची मागणी
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी आहे. जिल्हाप्रमुखांचत्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, ‘ आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिलं आहे. दोन चार दिवसात काय निर्णय येतो हे महत्त्वाचं राहील. कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर काय होईल?
पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगावर केस केली जाईल. खटला भरला जाईल. कुणाच्या निधीवर दरोडा टाकण्याचा अधिकार आयोगाला नाही. त्यांना फक्त चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्याचा अधिकार आहे. निवडणुका घेणं हा अधिकार नाही. निवडणूक आयोग म्हणजे सुल्तान नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.