पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे तिसरा इंदोरचा कसोटी सामनाही तीन दिवसात निकाली निघाला. पण निकाल पहिल्या दोन कसोटी सामन्यांसारखा लागला नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट राखून विजय मिळवला. अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाचा (0) विकेट गमावून आरामात हे लक्ष्य पार केलं. ट्रेव्हिस हेड नाबाद (49) आणि लाबुशेन नाबाद (28) यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत. सीरीजमध्ये आता 2-1 अशी स्थिती आहे. टीम इंडिया पराभूत झाली असली, तरी अजूनही आघाडीवर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडेच रहाणार आहे. ऑस्ट्रेलियाकडे आता शेवटचा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे.
टीम इंडिया कोणामुळे हरली?
या सीरीजमध्ये टीम इंडियाला फिरकी गोलंदाजांनी यश मिळवून दिलय. त्यामुळे नागपूर, दिल्लीप्रमाणे इंदोरची विकेट सुद्धा फिरकीला अनुकूल बनवली होती. पण इंदोरमध्ये टीम इंडियाचाच गेम झाला. पाहुण्यांऐवजी टीम इंडिया फिरकीच्या जाळ्यात अडकली. पहिल्या डावात 109 आणि दुसऱ्याडावात टीम इंडियाला फक्त 163 धावा करता आल्या. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे टीम इंडियाने तिसरा कसोटी सामना गमावला. या कसोटी सामन्यात भारताकडून फक्त चेतेश्वर पुजाराने (59) अर्धशतकी खेळी केली. बाकी सर्व फलंदाज फ्लॉप ठरले.
मॅथ्यू कुहनेमन आणि नाथन लियॉन या दोन फिरकी गोलंदाजांच्या बळावर ऑस्ट्रेलियाला हा कसोटी सामना जिंकता आला. मॅथ्यू कुहनेमनने पहिल्या डावात 9 ओव्हरमध्ये 16 धावा देऊन 5 विकेट काढल्या. दुसऱ्याडावात नाथन लियॉनने 23.3 ओव्हर्समध्ये 64 धावा देऊन 8 विकेट काढल्या. कुहनेमनने या कसोटीत 6 तर लियॉनने एकूण 11 विकेट काढल्या. फिरकी गोलंदाजीच्या बाबतीत बोलायच झाल्यास, भारतापेक्षा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांनी जास्त चांगली कामगिरी केली.
आज तिसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांच सोपं लक्ष्य होतं. ऑस्ट्रेलियाची दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही. अश्विनने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अश्विनच्या गोलंदाजीवर भरतने झेल घेतला. एक रन्सवर पहिली विकेट गेल्यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. ट्रेव्हिस हेड नाबाद (49) आणि लाबुशेन नाबाद (28) यांनी आरामात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.