सोनगे ता. कागल येथील धुणे धुण्यासाठी गेलेला तरुण वेदगंगेच्या पात्रात बुडाला आहे. संजय आनंदात तोरसे (वय ४०) असे त्याचे नाव असून ते मूळचे खडकेवाडा ता. कागल गावचे असून ते राहण्यास सोनगे गावी आहेत. दीड तासापूर्वी घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी, सोनगे गावची यात्रा आठदिवसावर आली असल्याने संजय तोरसे हे आज सकाळी वेदगंगा नदीकाठी बस्तवडे जुन्यापुला जवळ यात्रेचे धुणे धुण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत गेले होते. वेदगंगा नदीमध्ये धरणातून पाणी सोडल्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. धुणे धुवून झाल्यानंतर ते नदी काठालगतच थोडे पात्रात पोहण्यासाठी गेले. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे पाण्यात भोवरा मारत होता. त्यामुळे तोरसे यांना अंदाज न आल्याने पोहता येत असूनही ते पाण्याच्या प्रवाहात गेले. त्यांना बाहेरच पडता आले नाही. त्यांची दोन्ही मुलेही पाण्यातच होती. पण त्यांनाही प्रचंड पाण्याच्या प्रवाहापुढे कांहीही करता आले नाही. तोरसे हे मंडलिक साखर कारखान्यात नोकरी करतात.
प्रवाह जोराचा असल्याने आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. रेस्क्यू फोर्सच्या गडहिंग्लजमधील जवानांना बोलावले आहे. त्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे.