केंद्र शासन आणि राज्य शासन आपआपल्या स्तरावर देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु करतात. या योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केल्या जातात. शेतकऱ्यांचे हित जोपासून त्यांच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी शासन या योजना चालवत असते.
यात पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे.
दरम्यान या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी केंद्रातील भाजप सरकार आता मैदानात उतरले आहे.
शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. विविध विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी संबंधितांना शासनाकडून सूचना दिल्या जात आहेत. एवढेच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, महिलांना, विद्यार्थ्यांना साधण्यासाठी शासनाने विविध योजनेची पायाभरणी सुरू केली आहे.
विशेषतः शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासन विशेष प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. केंद्र शासन येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांकडे मोठा गेम चेंजर फॅक्टर म्हणून पाहत आहे. यामुळे येत्या दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन 12 नवीन योजनांची सुरुवात करू शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आला आहे.
तसेच सध्या सुरू असलेल्या काही योजनांमध्ये मोठा फेरबदल होऊ शकतो असे देखील मत व्यक्त होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेत देखील मोठा फेरबदल होण्याची शक्यता तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. पीएम मोदी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करणार असा दावा केला जात आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत सध्या 6000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे मात्र आता हा वार्षिक लाभं 12 हजार करण्याची घोषणा केंद्र शासन करणार असा दावा केला जात आहे. अर्थातच पीएम किसान योजनेच्या रकमेत सहा हजार रुपयांची वाढ केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत जर १२ हजार रुपये वार्षिक लाभ देण्यास केंद्र शासनाने सुरुवात केली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे बारा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण 18000 रुपये प्रति वर्ष मिळणार आहेत. निश्चितच, केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.