वधू दाखवण्याच्या बहाण्याने एका वधू-वर सूचक मंडळाच्या चालकाने वराच्या घरातील 12 तोळ्यांच्या दागिने लंपास केले आहे. कोल्हापूर शहारातील अयोध्या कॉलनीमध्ये विपुल सूर्यकांत चौगुले यांच्या घरी वधू-वर सूचक मंडळाच्या चालकाने दागिन्यांची चोरी केली होती.याप्रकरणी कोल्हापुरातील फुलेवाडी येथील केंद्रचालक रोहन रवींद्र चव्हाण याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
शहारातील फुलेवाडी रिंगरोड येथील अयोध्या कॉलनीमध्ये विपुल सूर्यकांत चौगुले यांच्या घरी 24 जूनला चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता. गोपनीय बातमीदाराच्या मार्फत फुलेवाडी रिंगरोड ते रंकाळा रोडवर चोरीचे दागिने विकण्यासाठी संशयित चोरटा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून संशयित रोहन चव्हाण याला ताब्यात घेतले. चव्हाण याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
वर विपुल चौगुले याला वधू दाखवण्याच्या बहाण्याने रोहन चव्हाण वारंवार अयोध्या कॉलनीतील चौगुले यांच्या घरी जात असायचा. यावेळी त्याने घराची पूर्ण टेहाळणी केली होती. घरात कोण कधी येते जाते याची पूर्ण माहिती रोहन याला होती. वधू दाखवण्याच्या बहाणा करून विपुल चौगुले यांच्या वडिलांना रोहन चव्हाण यांनी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि घरातील दागिन्यांवर डल्ला मारला.
विपुल चौगुले यांच्या वडिलांना चव्हाण यांनी कार्यालयात बोलावले होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सरबत घेऊन येतो, असे सांगून चौगुले यांचीच सायकल घेतली. चौगुले यांच्या सायकलाच घराची चावी होती. चव्हाणने सरबत आणण्यासाठी जातो असे सांगून त्यांची सायकल घेतली. कार्यालयातून निघत चव्हाणने थेट चौगुले यांच्या आयोध्या कॉलनीतील घर गाठले. घरात शिरत त्याने घरातील बारा तोळे दागिने लंपास केले. सुमारे साडेपाच लाखांचे चोरलेले दागिने घरी ठेवून पुन्हा तो कार्यालयात परतला. कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्यांनी ही चलाखी केली मात्र पोलिसांनी शिताफीने हा गुन्हा उघडकीस आणला.