रेंदाळ शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना आरोग्य विभाग सुस्त आहे. ग्रामपंचायतीने या साथीच्या आजारांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.एकट्या रामनगरमध्ये सात ते आठ डेंग्यू सदृश्य रुग्ण असून जिल्हा परिषदेच्या शासकीय आरोग्य विभाग नेमके करतोय काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
यापूर्वी याबाबत साथीच्या आजारांचे वाढते गांभीर्य आरोग्य विभागाच्या लक्षात आणून दिले होते. ग्रामपंचायतीने ही धोक्याची घंटा समजून औषध फवारणीसह गाव सव्र्व्हे करण्याची मागणी जनतेमधून होत असताना तोंड देखले नियोजन करण्यात आले. आरोग्य विभागाने पाठ घेतली म्हणून रुग्ण सापडलेल्या गल्लीत मॅरेथॉन औषध फवारणी आटोपली मात्र मुळापासून साथीच्या आजारांना नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीने याकडे गांभियाने पाहिले नाही आणि आरोग्य विभागाने फक्त पावसाने हजेरी लावल्याने पाण्याची डबकी तळी तयार होत आहेत यात गटारीचे सांडपाणी मिसळत आहे. उघड्यावर कचरा टाकला जातोय यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
खाजगी दवाखान्यात डेंग्यूच्या रुग्णांची प्रमाणाबाहेर संख्या असताना रेंदाळ येथील आरोग्य विभागाला समजतं नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. डासाची उत्पत्ती होणार नाही यासाठी पाणी साठे तपासले, सव्र्व्हे केला. आरोग्य तपासणी केली असती तर भयावह परिस्थिती समोर आली असती. संपूर्ण शहरात डेंग्यूच रुग्ण संख्या वाढत चालली आहे. ग्रामसेवकांची विशेष हालचाल दिसत नाही. चिकन गुनिया, मलेरिया, गॅस्ट्रो व लेप्टोपायरोसिस यासारख्या जलजन्य आजारांनी डोकेवर काढायला सुरुवात केली आहे.
डेंग्यू कोरडा दिवस पाळावा म्हणून आरोग्य विभागाने प्रबोधन केले पण रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता खाजगी डॉक्टर आणि लॅब चालकांशी संवाद साधला नाही असे दिसून येत आहे. हिवताप कार्यालय कोल्हापूरचे आरोग्य सहा. सुरज नेतले यांनी कामकाजाचा भाग म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेतली पण पुढे काय? काय उपाययोजना केल्या याबाबत आपल्या विभागाची उजळणी केली नाही. साथ वणव्यासारखी पसरत आहे. तेव्हा या डेंग्यू सदृश्यसाथीचे निर्मुलन करण्यासाठी जिल्हा पातळीवरील शासकिय आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याबाबत सूचना देऊन डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जनतेमधून होत आहे.