राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या साखळीतील एक कडी असलेल्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी मिरज तालुक्यातून अटक केली. त्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात ड्रग्ज व्यापाराचे जाळे विणले गेले आहे का, याची चौकशी सुरू आहे. मिरजेत तंबाखूइतका सहज गांजा मिळतो, असे म्हटले जाते. आता ड्रग्जने इथे पाय पसरायला सुरवात केली आहे का, हा प्रश्न गंभीर आहे.
पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यात अनेक राजकीय नेत्यांची नावेही समोर आली. एकमेकांवर आरोप केले गेले. त्यातून वादळ उठले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या रॅकेटच्या माध्यमातून ड्रग्जनिर्मिती आणि विक्रीची व्यवस्था उभारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यात सांगली जिल्ह्यातील एका तरुणाचा समावेश असल्याचे समोर आले.त्यातूनच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावचा रहिवासी असलेला तरुण ललित याच्या रॅकेटमध्ये काम करत होता, हे समोर आले. गेल्या काही वर्षांपासून हा तरुण गावातून गायब होता. विविध गुन्ह्यांत त्याचा सहभाग आहे. त्याचे जिल्ह्यातील काही गुन्हेगारांशी आणि इथल्या रॅकेटशी संबंध आहेत का, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही माहिती जिल्ह्यासाठी धक्कादायक आहे. बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी त्याचा या प्रकरणातील सहभाग काय, हे तपासायला सुरवात केली आहे.
खुनाचे सत्र अन् नशा…
सांगली जिल्ह्यात एकामागून एक आणि अत्यंत किरकोळ कारणांतून खून होण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामागे प्रमुख कारण नशेबाजी असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील तरुणाच्या ‘मॅफेड्रॉन’सारख्या अमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये सहभागामुळे हे प्रकरण आणखी गंभीर चिंतेचा विषय ठरणार आहे. याबाबत पोलिसांनी सावध होण्याची गरज आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एकाला अटक झाल्याबाबतची माहिती पोलिसांनी नाही. अर्थात, ही अत्यंत गोपनीय कारवाई झाली असून त्याचा तपास स्वतंत्रपणे पुणे पोलिस करत आहेत. त्याच्या सांगलीतील साखळीपर्यंत मात्र पोहोचावे लागेल. त्यासाठी जिल्हा पोलिसांना सतर्क व्हावे लागेल.अनर्थ टाळण्यासाठी हवी कारवाई
जिल्ह्यात नशेच्या गोळ्या, गांजा सहज उपलब्ध होतो, हे ‘सकाळ’ने अनेकदा उजेडात आणले आहे. काही वर्षांपूर्वी तर ‘स्टिंग ऑपरेशन’ करून ‘तंबाखूइतका सहज गांजा मिळतो,’ हे मांडले होते. ते प्रकरण आता गंभीर स्वरुपाच्या वळणाकडे निघाले आहे. ‘मॅफेड्रॉन’सारख्या अमली पदार्थाची निर्मिती आणि वितरणाची व्यवस्था चालवणाऱ्या ललित पाटील याला अटक झाल्यानंतर राज्यभरातील त्याचे रॅकेट समोर आले. त्याच्या माध्यमातून काम करणाऱ्यांची माहिती पुढे आली. त्यात मिरज तालुक्यातील एका तरुणाचा थेट सहभाग उघड झाल्याने ही बातमी सांगली जिल्ह्याची चिंता वाढवणारी आहे. गुप्त पद्धतीने होत असलेली उलाढाल सामाजिक अनर्थ घडवू शकते. त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाची पाळेमुळेे शोधून त्यावर कडक कारवाईची गरज आहे.