ताजी बातमी ऑनलाईन टीम
पोलिस असल्याची बतावणी करत वृध्दाकडील ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास करण्यात आले. या प्रकरणी चंद्रकांत गोविंद बावणे (वय ६८ रा. पारीक कॉलनी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चंद्रकांत बावणे हे गुरुवारी दुपारच्या सुमारास कोल्हापूर रोडवरुन चालत निघाले होते. ते बालाजी फोटो स्टुडिओच्या दारात असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी बावणे यांना थांबविले. आम्ही पोलिस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवून या परिसरात दोन लाखाची चोरी झाली आहे. त्याची चौकशी सुरु असल्याचे सांगत हातात रुमाल घेत त्यामध्ये बावणे यांच्याकडील पाकिट, सोन्याची चेन आणि अंगठी ठेवण्यास सांगितले. बावणे यांनी अर्धा तोळ्याची चेन व अर्धा तोळ्याची अंगठी काढून रुमालात ठेवली. काही वेळानंतर त्या व्यक्तींनी रुमाल बावणे यांच्याकडे देत निघून गेल्या. बावणे यांनी रुमाल उघडून पाहिले असता त्यामध्ये केवळ पाकिट मिळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने बावणे यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.