ताजी बातमी ऑनलाईन टीम
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील चार कैद्यांनी कात्रीने वार करून एका कैद्याचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २८) दुपारी घडला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. महेश महादेव चंदनशिवे (रा. चिखली, जि. पुणे) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे.
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अनिकेत श्रीकृष्ण समदुर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी मुरे आणि गणेश हनुमंत मोटे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात चंदनशिवे ३० नोव्हेंबर २०२२ पासून येरवडा कारागृहात आहे. त्याला सर्कल दोनमधील बराकीमध्ये ठेवले होते.
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास चार कैद्यांनी चंदनशिवे याच्यावर हल्ला केला. केस कापण्याची कात्री आणि दरवाजाच्या तुकड्याने त्याच्या मानेवर आणि पोटावर वार केले. या हल्ल्यात चंदनशिवे गंभीर जखमी झाला. कारागृहातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून ससून रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.