मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. आंदोलनाचा 14 वर्षांचा वनवास संपला. समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाले. मराठा समाजासाठी 2011 पासून सुरु केलेल्या आंदोलनाला अखेर 2024 मध्ये यश आले. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता. या प्रवासातील शेवटचे आंदोलन करताना मनोज जरांगे पाटील कमालीचे भावूक झाले होते. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघताना त्यांना आपले आश्रू रोखता आले नव्हते.कधीपासून सुरु झाले आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी 2011 पासून मराठा समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. आरक्षणाच्या चळवळीत ते 2011 मध्ये सक्रिय झाले. अवघ्या तीन वर्षांत ते आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करु लागले. त्यांनी 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा लक्षवेधक ठरला. त्यानंतर 2015 ते 2025 या काळात त्यांनी 30 हून अधिक आंदोलने केली.
समाजाच्या आरक्षणासाठी जमीन विकली
मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील मोतोरी या गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. त्यांच्या घराची परिस्थिती सामान्य होती. यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम सुरु केले. परंतु समाजासाठी काम करायचे त्यांनी ठरवले आणि कुटुंबकडे दुर्लक्ष करत मराठा आंदोलनात सहभागी झाले.
मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले.शिवबा संघटनेची स्थापना
मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. जालनामधील साष्ट पिंपळगाव येथे तब्बल 90 दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी सहा दिवस उपोषणही केले. मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसचे काम केले होते. परंतु राजकीय वातावरणात ते रमले नाहीत.
लाठीचार्जनंतर राज्याचे लक्ष वेधले
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 पासून आरक्षणासाठी उपोषण सुरु केले होते. 1 सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागले.