ताजी बातमी ऑनलाईन टीम
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे रोख रक्कम, ठेवी, शेअर्स, गुंतवणूक आदींसह घर, जमीन, सोने आदी 32 कोटी 75 लाख 49 हजार रुपयांची मालमत्ता आहे. याखेरीज पत्नी, मुलगी आदींसह कुटुंबाची एकूण मालमत्ता 40 कोटी 91 लाख 94 हजार रुपये इतकी आहे. विधान परिषदेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासमवेत पाटील यांनी सादर केलेल्या मालमत्तेबाबतच्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
विविध बँकांतील ठेवी, शेअर्स, विमा, पोस्ट आदी ठिकाणी केलेली गुंतवणूक, रोख रक्कम आदी 16 कोटी 28 लाख 11 हजार रुपये तर कसबा बावडा, ताराराणी चौक, गारगोटी, मुंबई, उजळाईवाडी, पन्हाळा आदी ठिकाणची स्थावर मिळकत तसेच तळसंदे, सैतवडे, साखरी, बावेली आदी ठिकाणची शेत जमीन अशी सुमारे 16 कोटी 47 लाख 37 हजार रुपयांची पाटील यांच्या नावे मालमत्ता आहे. यासह पाटील यांच्याकडे 14 लाख 83 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
पाटील यांचे बँक आणि सेवा सोसायट्यांचे मिळून एकूण 16 कोटी 53 लाख 82 हजारांचे कर्जही आहे. यासह न्यायालयीन स्थगिती असलेले वादग्रस्त असे 2 कोटी 66 लाख 32 हजारांचे दायित्व असल्याचेही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. कुटुंबातील सदस्यांसह अन्य मित्रमंडळीकडून विनातारण कर्ज घेतल्याचाही तसेच उसनी रक्कम दिल्याचाही उल्लेख या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. पाटील यांच्या नावे टाटा सफारी हे एकच चारचाकी वाहन आहे. त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांच्या नावे कोणतेच वाहन नाही.