Sunday, May 19, 2024
Homeसांगलीसांगली : रामलल्लाच्या दर्शनासाठी ४४ प्रवाशांसह लालपरी विट्यातून रवाना

सांगली : रामलल्लाच्या दर्शनासाठी ४४ प्रवाशांसह लालपरी विट्यातून रवाना

जय श्रीरामच्या जयघोषात सोमवारी विट्यातून अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी राज्य परिवहन विभागाची बस मोठ्या थाटा-माटात रवाना झाली. परिवहन विभागाने जिल्ह्यात व पश्‍चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच अयोध्येसाठी बस उपलब्ध करून दिली असून सात दिवसांचा हा प्रवास आहे.अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभारल्यानंतर दर्शनासाठी देशभरातून रामभक्त जात आहेत. जिल्ह्यातील अनेक नागरिकांनीही सोयीनुसार खासगी वाहनांनी व रेल्वेने अयोध्येत रामल्लाच्या दर्शनासाठी धाव घेतली आहे. मात्र, सामान्य नागरिकांना आरामदायी आणि थेट अयोध्येपर्यंत बससेवा देण्याचा निर्णय सांगली विभागाने घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी विटा आगाराने सोमवारी केली.

विटा ते अयोध्या येताजाता अंतर ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० किलोमीटर असून या प्रवासासाठी प्रतिप्रवासी साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रवास खर्च अपेक्षित आहे. सात दिवसांचा प्रवास असून या प्रवासासाठी विनोद लंगडे आणि निवास थोरात हे दोन चालक संपूर्ण प्रवासामध्ये या बसचे सारथ्य करणार आहेत. बसला काही ठिकाणी विसावा देण्यात आला असून निरंतर प्रवास आरामदायी व्हावा अशी अत्याधुनिक बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

विट्याहून अयोध्येला सोमवारी सकाळी फटाक्याची आताषबाजी करत जय श्रीरामचा नारा देत मार्गस्थ झालेल्या बसमध्ये ४४ प्रवासी असून यामध्ये ३४ महिला आहेत. प्रवाशांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यासाठी दोन डॉक्टरही बसमध्ये वैद्यकीय साहित्य व औषधासह आहेत. बसला मार्गस्थ करताना विभाग नियंत्रक सुनील भोकरे, यंत्र अभियंता रमेश कांबळे, वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, आगार प्रमुख विद्या कदम, वाहतूक निरीक्षक विनायक माळी, स्थानक प्रमुख रोहित गुरव आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -