आयपीएल स्पर्धेत वानखेडेवर रंगलेल्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धुव्वा उडवला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत मुंबई इंडियन्सने गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 8 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावा दिल्या. या धावसंख्येत कर्णधार फाफ डू प्लेसिस, रजत पाटिदार आणि दिनेश कार्तिक यांची खेळी महत्त्वाची ठरली. तिघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ही धावसंख्या गाठणं शक्य झालं.
पण इशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या आक्रमक खेळीमुळे सर्व काही फिकं पडलं. इशान किशनने 34 चेंडूत 69 धावा, तर सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 52 धावा केल्या. यामुळे मुंबई इंडियन्सने 15.3 षटकात विजयी धावा पूर्ण केल्या. या विजयानंतर हार्दिक पांड्या संघावर खूश झाला आहे. तर बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नेमकं काय चुका झाल्या याचा पाढा वाचून दाखवला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, “जिंकणे चांगलं असतं. खरंच आज आम्ही चांगलं खेळलो. इम्पॅक्ट खेळाडूमुळे गरज पडल्यास अतिरिक्त गोलंदाज वापरण्याची संधी मिळाली आहे. रोहित आणि किशन यांची चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे विजयी धावा लवकर गाठणं महत्त्वाचं होतं. हे पूर्णपणे टीमवर्क आहे. खेळाडूंना काय करावे हे माहित आहे. बुमराहबाबत सर्वोत्तम बॉलर आहे. सूर्यकुमार यादवने अर्धशतक केले तेव्हा मी त्याला बोललो की स्वागत आहे.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला की, “पराभव पचवणं खरंच खूप कठीण आहे. खूपच दव होतं. त्यामुळे नाणेफेक जिंकणे आवश्यक होतं. दुसरं म्हणजे ते खरोखर चांगले खेळले आणि आमच्यावर दबाव आणला आणि आम्ही बरेच काही केले. दव हा घटक होता त्यामुळे 250 प्लस धावा करणं गरजेचं होतं. चेंडू खूप ओला होता आणि गोलंदाजांना त्रास झाला.
मी आणि पाटिदारने चांगली भागीदारी केली. पण बुमराहच्या हाती चेंडू असली की तुम्हाला त्याच्यावर दबाव आणावा लागेल, असं वाटतं. पण तो दबावाखाली चांगली गोलंदाजी करतो. लसिथ मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली तो आणखी चांगला झाला आहे, असे मला वाटते. तो आमच्या टीमचा भाग असता तर आम्हाला आवडले असते.”