Thursday, May 16, 2024
Homeक्रीडामुंबई इंडियन्सला विजयानंतर मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये धमाका, पाहा कोण कुठे?

मुंबई इंडियन्सला विजयानंतर मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये धमाका, पाहा कोण कुठे?

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आरसीबीने कॅप्टन फाफ डु प्लेसिस 61, रजत पाटीदार 50 आणि दिनेश कार्तिक याच्या नाबाद 53 धावांच्या जोरावर 8 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान मिळालं. मुंबईने हे आव्हान 27 बॉलआधी 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 15.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. मुंबईकडून दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर उर्वरित चौघांनी अफलातून योगदान दिलं.

मुंबईकडून ईशान किशन याने 34 बॉलमध्ये 69 धावांची खेळी केली. रोहित शर्मा याने 24 बॉलमध्ये 38 धावा जोडल्या. सूर्यकुमार यादव याने 19 बॉलमध्ये 52 धावांची विस्फोटक खेळी केली. तर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. हार्दिक पंड्या याने विनिंग शॉट मारला. हार्दिकने 6 बॉलमध्ये नॉट आऊट 21 रन्स चोपल्या. तर तिलक वर्मा 16 धावांवर नाबाद राहिला. मुंबईचा हा या मोसमातील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तर आरसीबीने पराभवाचा चौकार लगावला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घेऊयात.

मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये झेप

दरम्यान मुंबई इंडियन्सला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. आरसीबी पराभवानंतर त्याच स्थानी कायम आहे. मात्र मुंबईच्या विजयामुळे पंजाबला फटका बसला आहे. मुंबईने या विजयासह आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईने 27 बॉल राखून विजय मिळवल्याने मुंबईला नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे. मुंबई आता ताज्या आकडेवारीनुसार, -0.073 नेट रनरेटसह सातव्या स्थानी पोहचली आहे. मुंबईचा नेट रनरेट हा सामन्याआधी -0.704 असा होता.तर मुंबई सातव्या स्थानी पोहचल्याने पंजाब एका स्थानच्या नुकसानासह आठव्या स्थानी घसरली आहे. मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांनी 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. मात्र पंजाबच्या तुलनेत मुंबईचा नेट रनरेट चांगला असल्याने मुंबई सातव्या स्थानी आहे. पंजाबचा नेट रनरेट हा -0.196 इतका आहे. तर आरसीबी -1.124 नेट रनरेटसह नवव्या स्थानी आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा सामन्याआधी -0.843 असा होता.

 

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.

 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -