पुणे-बेंगळूर महार्गावर अमली पदार्थ ची तस्करी करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास वाघवाडी (ता.वाळवा ) फाटा येथे पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. माकेटो जॉन झाकिया(२५,रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन पोलिसांनी हस्तगत केले. झाकिया हा कोकेन घेऊन मुंबईहून कोल्हापूरला निघाला होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खासगी ट्रॅव्हल्स मधून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी रात्री पोलिसांनी वाघवाडी फाट्यावर नाकाबंदी केली. पोलिसांनी वाहने अडवून बस (क्र. के.ए.-५१-ए.एफ.६२९१) झडती घेतली. त्यावेळी झाकिया याच्या बॅगेमध्ये १०९ ग्रॅम कोकेन पोलिसांना सापडले. कोकेन व झाकिया याचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिस दीपक ठोंबरे यांनी वर्दी दिली. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे तपास करीत आहेत.