क्रिकेटमध्ये क्षणोक्षणी खेळ बदलत असतो. शेवटचा चेंडू होत नाही, तोवर कोणता संघ विजयी होणार? हे सांगता येत नाही. या वरुन क्रिकेट खेळ किती अनिश्चिचततेचा आहे, याचा अंदाज बांधता येतो. सामन्याआधी होणाऱ्या टॉसमुळे सामन्याचं गणित ठरतं. दोन्ही संघाचे कर्णधार खेळपट्टीनुसार टॉसनंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवतात. टी 20 क्रिकेटमध्ये टॉससोबत बरंच काही ठरतं. बीसीसीआयने आता या टॉसबाबत आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने एका स्पर्धेतून टॉस हा प्रकारच हद्दपार केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या निर्णयाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी अनेक सूचना केल्या. त्यामध्ये टॉस हद्दपार करण्याचा प्रस्तावही आहे. क्रिकबझनुसार, जय शाह यांनी एपेक्स काउंसिलसमोर प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात, सीके नायडू अंडर 23 स्पर्धेतून टॉस प्रकार हद्दपार करण्याचा उल्लेख आहे. या स्पर्धेतून टॉस हद्दपार केला जाईल आणि पाहुण्या संघाला बॅटिंग/फिल्डिंग जे हवं ते करण्याची सूट दिली जाईल, अशी माहिती जय शाह यांनी दिली.
आयपीलमध्येही टॉस होणार नाही?
क्रिकेटमधील काही जाचक नियमांमध्ये बदल करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिग्गजांसह क्रिकेट चाहत्यांचीही आहे. अनेक आजी-माजी दिग्गज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नियमांमध्ये बदल व्हावेत, यासाठी आग्रही असतात. आता जय शाह यांच्या प्रस्तावानंतर सी के नायडू अंडर 23 स्पर्धेतून टॉसचा हटवण्याचा निर्णय घेतला गेला, तर तो ऐतिहासिक ठरेल. तसेच हा निर्णय इतर महत्त्वाच्या स्पर्धेसह आयपीएलमध्येही लागू होणार का? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
शार्दूल ठाकुरच्या तक्रारीचं निवारण!
जय शाह यांनी आपल्या प्रस्तावात टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याच्या तक्रारीचाही उल्लेख केला आहे. शार्दूलने काही आठवड्यांआधी तक्रार केली होती. शार्दुलने गेल्या रणजी स्पर्धेतील सेमी फायनलनंतर मुद्दा उचलला होता. त्यानुसार, सामन्यामध्ये खेळाडूंसाठी विश्रांतीसाठी पर्याप्त वेळ असायला हवा. आता शाह यांनी शार्दुलची ही मागणीही मान्य केल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार आगामी हंगामात खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल, जेणेकरुन खेळाडू आणखी ताकदीने मैदानात उतरतील.