आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने केला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. लखनऊने मुंबईसमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 196 धावाच करता आल्या. मुंबईचाही हा अखेरचा सामना होता. मुंबईच्या चाहत्यांना घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये पलटण विजयाने शेवट करेल, अशी आशा होती. मात्र मुंबईच्या रोहित शर्मा आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली.
मुंबईची 215 धावांचा पाठलाग करताना अफलातून सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या दोघांनी 88 धावांची सलामी भागीदारी केली. रोहित शर्माने या दरम्यान अर्धशतक ठोकलं. डेवाल्ड ब्रेव्हिस 23 धावांवर आऊट झाला. मात्र त्यानंतर मुंबईची घसरगुंडी झाली. लखनऊने मुंबईला ठराविक अंतराने झटके दिले. सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्मा 68 धावांवर आऊट झाला. कॅप्टन हार्दिक पंड्याने निराशा केली. हार्दिक 16 धावांवर बाद झाला. नेहल वढेराने 1 धाव जोडली.
त्यानंतर ईशान किशनने नमन धीर याला चांगली साथ दिली. या जोडीने मुंबईच्या आशा कायम ठेवल्या. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ईशान किशन 14 धावा करुन आऊट झाला. नमन धीरने अखेरपर्यंत एकाकी झुंज दिली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. नमनने मुंबईसाठी 28 बॉलमध्ये नाबाद 62 धावांची खेळी केली. तर रोमरिया शेफर्ड 1 रनवर नॉट आऊट परतला. लखनऊकडून नवीन उल हक आणि रवी बिश्नोई या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कृणाल पंड्या आणि मोहसिन खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
लखनऊची बॅटिंग
दरम्यान त्याआधी मुंबईने टॉस जिंकून कॅप्टन हार्दिक पंडया याने लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनऊने कॅप्टन केएल राहुल आणि निकोलस पूरन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या 109 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. लखनऊसाठी निकोलस पूरन याने 75, केएलने 55, मार्कस स्टोयनिसय याने 28 आणि दीपक हुड्डाने 11 धावा केल्या. तर अखेरीस कृणाल पंड्या आणि आयुष बदोनी या दोघांनी अनुक्रमे नाबाद 12 आणि 22 धावा केल्या. मुंबईकडून पीयूष चावला आणि एन तुषारा या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर्स : रोहित शर्मा, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय.
लखनऊ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेअर्स : नवीन-उल-हक, ॲश्टन टर्नर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड आणि कृष्णप्पा गौथम.