आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरता-फिरता स्वत:भोवती देखील फिरते, ही बाब आपल्याला शाळेत शिकवली जाते. पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याच्या क्रियेला ‘परिवलन’ म्हणतात. या परिवलन क्रियेमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते.
पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तासांचा कालावधी लागतो. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की भविष्यात एका दिवसाचा कालावधी 24 तासांऐवजी 25 तासांचा होणार आहे. भविष्यात पृथ्वीला एका परिवलन चक्रासाठी 24 तासांऐवजी 25 तास लागतील. त्यामुळे पृथ्वीवर दिवस मोठा होईल. इतकंच नाही तर एक वर्षाचा कालावधी 365 दिवसांपेक्षा कमी होईल.
जेव्हा पृथ्वीवरचा एक दिवस 25 तासांचा असेल, तेव्हा वर्षात किती दिवस असतील, हे जाणून घेऊया. सध्या पृथ्वीवर एका वर्षात 365 दिवस असतात. म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पण, जर भविष्यात एका दिवसाची लांबी वाढली तर त्यानुसार वर्षातील दिवसांची संख्या कमी होईल. कारण, पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा तितक्याच तासांमध्ये पूर्ण करेल आणि वर्षाचे दिवस 365 वरून 350 पर्यंत कमी होतील.
लाइव्ह सायन्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पृथ्वीची फिरण्याची वेळ निश्चित नाही आणि ती सतत वाढत आहे. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, पृथ्वीच्या फिरण्याचा वेग सतत कमी होत आहे आणि त्यामुळे दिवसाचा कालावधी सतत वाढत आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग खूप जास्त होता. त्या वेळी एक दिवस 24 तासांचा नव्हता. पृथ्वीफक्त 19 तासांत एक परिवलन चक्र पूर्ण करत होती. हा बदल अनेक दशलक्ष वर्षांतून एकदा होतो. सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरचा दिवस 19 तासांचा होता.
पृथ्वीवरच्या एका दिवसाचा वेळ वाढण्याची गती खूपच कमी आहे. एका शतकात म्हणजे 100 वर्षांमध्ये 1.8 मिलीसेकंद एवढ्या दराने दिवसाचा कालावधी वाढत आहे. हजारो वर्षांत हा कालावधी एका सेकंदाने वाढत आहे. 3.3 दशलक्ष वर्षांनी दिवसाचा कालावधी एका मिनिटाने वाढत आहे. अशा स्थितीत पृथ्वीवरच्या दिवसाच्या कालावधीत एका तासाची वाढ होण्यासाठी 20 कोटी वर्षं लागतील.
पृथ्वीचा वेग कमी होण्यासाठी चंद्र कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातल्या भरती-ओहोटीच्या संबंधामुळे हे घडत आहे. भरतीमुळे निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे पृथ्वीच्या गतीवर परिणाम होत आहे. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या सर्वांत जवळ असलेल्या भागाला आपल्याकडे खेचतं. त्यातून भरती तयार होते. चंद्र आणि पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगाशी भरतीचा वेग जुळत नाही. परिणामी, समुद्रतळावर घर्षण होते आणि पृथ्वीच्या वेगात अडथळा येतो.