हल्ली ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी अनेक जण अॅप वापरतात. फोन पे, गुगल पे व पेटीएम ही काही महत्त्वाची अॅप्स आहेत. त्यांचा ऑनलाइन पेमेंटसाठी सर्वाधिक वापर केला जातो. आता पेटीएमने आरबीआयच्या एका कारवाईनंतर मोठा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार अनेक पेटीएम अकाउंट्स बंद होणार आहेत. एका महिन्याच्या आतच ही सर्व अकाउंट्स बंद केली जातील. तुम्ही पेटीएम वॉलेट वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अलीकडेच आरबीआयने केवायसी नियमांचं पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली होती. आता पेटीएम बँकेने (पीपीबीएल) म्हटलंय की काही पेटीएम वॉलेट्स बंद केले जातील. एका अंदाजानुसार, पेटीएमने केलेल्या या घोषणेचा हजारो ग्राहकांवर परिणाम होऊ शकतो. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, झिरो बॅलन्स असलेली व एक वर्षापेक्षा जास्त काळ कोणतेही व्यवहार न केलेली अकाउंट्स व वॉलेट्स 20 जुलै 2024 रोजी बंद होतील.
30 दिवस अगोदर जारी केली जाईल नोटीस
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इनअॅक्टिव्ह पेटीएम वॉलेट युझर्सना वॉलेट बंद होण्याच्या 30 दिवस आधी नोटीस जारी केली जाईल. ज्या वॉलेटमध्ये गेल्या एक वर्षात किंवा त्याहून अधिक कालावधीत कोणतेही व्यवहार झालेले नाहीत आणि ज्यांचा बॅलन्स झिरो आहे, ती सर्व वॉलेट्स 20 जुलै 2024 पासून बंद होतील.
( ‘या’ नव्या फोननं मार्केटमध्ये घातलाय धुमाकूळ; आयफोनवाल्यांनाही पडली भुरळ )
बॅलन्स वापरण्यात कोणतीही अडचण नाही
याआधी मार्च महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पीपीबीएलला नवीन डिपॉझिट स्वीकारण्यास किंवा क्रेडिट व्यवहारांना मान्यता देण्यास नकार दिला होता. तुम्ही तुमच्या वॉलेटचा बॅलन्स कोणत्याही अडचणींशिवाय वापरू किंवा काढू शकता, असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पेटीएमच्या या सूचनांचं पालन केल्याने, तुमचं अकाउंट किंवा वॉलेटमध्ये जमा केलेल्या पैशांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होणार नाही.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वतीने ग्राहकांना सल्ला देण्यात आला आहे, की त्यांनी त्यांची इनअॅक्टिव्ह अकाउंट्स व वॉलेट अॅक्टिव्ह करावं किंवा बंद करावं. हे शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण न केल्यास अकाउंट व वॉलेट आपोआप बंद होईल.