पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंगळवारी लोकसभेत भाषण झालं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. पीएम मोदी यांचं भाषण दोन तासापेक्षा जास्त वेळ चाललं. या दरम्यान विरोधी पक्षाचे खासदार मोदी यांचं भाषण सुरु असताना विरोध करत होते. सभागृहात विरोधी पक्षाच्या खासदारांची जोरजोरात घोषणाबाजी सुरु होती. काही नेते वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करु लागले. या दरम्यान पंतप्रधान मोदींची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. वेलमध्ये घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांसाठी पीएम मोदी यांनी पाण्याच ग्लास पुढे केलं. महत्त्वाच म्हणजे हे खासदार मोदीं विरोधातच घोषणबाजी करत होते. पीएम मोदी यांनी काँग्रेस खासदार मणिक्कम टॅगोर यांना पाण्याच ग्लास देऊ केलं. पण त्यांनी ग्लास घेतलं नाही. त्यानंतर मोदींनी दुसरे खासदार हिबी ईडन यांना पाण्याच ग्लास दिलं. ते पाणी प्याले.
विरोधी पक्ष पीएम मोदी यांच्या भाषणा दरम्यान गोंधळ घालत होता. पीएमनी हेडफोन लावला होता. या दरम्यान ते पाणी प्याले व विरोधी पक्षाच्या खासदारांना सुद्धा पाण्यासाठी विचारलं. पीएम मोदी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हिबी ईडन केरलच्या एनार्कुलम येथून खासदार आहेत. सलग दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिबी ईडन यांनी एर्नाकुलम येथून सीपीआय (एम) चे के पी. राजीव यांना 1.6 लाख पेक्षा जास्त मतांनी हरवलं होतं.
‘स्पर्धा वाढणं स्वाभाविक आहे’
भाषणा दरम्यान पीएम मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसवर खोट बोलण्याचा आरोप केला. त्यांनी देशाची प्रगती रोखण्याचा आरोपही काँग्रेसवर केला. “भारत जसा-जसा प्रगती करतोय, स्पर्धा वाढणं स्वाभाविक आहे. आव्हान वाढतायत. ज्यांना भारताच्या प्रगतीपासून अडचण आहे, जे भारताच्या प्रगतीला आव्हान म्हणून पाहतात, ते चुकीचे मार्ग अवलंबत आहेत. या शक्ती भारताची लोकशाही, डेमोग्राफी आणि विविधतेवर हल्ला करत आहेत. ही फक्त माझी किंवा सरकारची चिंता नाहीय, देशाची जनता आणि सुप्रीम कोर्टही या गोष्टींमुळे चिंतित आहे” असं पीएम मोदी म्हणाले.