Wednesday, February 5, 2025
Homeसांगलीसांगलीकरांची चिंता वाढली! नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन ,शाळांना...

सांगलीकरांची चिंता वाढली! नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन ,शाळांना देखील सुट्टी

सांगली जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

जयंत पाटील यांनी सांगितले की, विशेषतः वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जिल्ह्यातील नद्यांची पातळी थोडीशी वाढली आहे. प्रशासनाने पाण्याचा विसर्ग कर्नाटकाकडे वाढवला तर नद्यांची पातळी कमी होईल. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे त्यांनी सांगितले. पूरस्थिती असलेल्या भागात राहण्याचे धाडस करू नये आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचावे असेही त्यांनी आवाहन केले.

कोयना धरणातील पाण्याची पातळी वाढ-

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आज शुक्रवारी दुपारी विश्रांती घेतली होती. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता कोयना धरणामध्ये ८२.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या कोयना धरणातून ३० हजार क्युसेक आणि पायथा विजगृहातून एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय-

शुक्रवारी सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून कोयना नदीत उद्या शनिवारी सकाळी नऊ वाजता १० हजार क्युसेकने वाढ करण्यात येणार असून नदीपात्रात ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नदीकाठी पुन्हा धोका वाढणार आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा-

कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करून नदीत २० हजार क्युकेस सोडण्यात आले. आज शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणातून पाणी सोडण्याच्या क्षमतेत वाढ करून आणखी १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

दुपारी १२ वाजता वाढवण्यात येणारा १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आल्याने दिलासा मिळाला होता. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे उद्या शनिवारी सकाळी नऊ वाजता १० हजार क्युसेकने वाढ करण्यात येणार असून नदीपात्रात ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा कृष्णा-कोयना नदीकाठी चिंता वाढणार आहे.

सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी –

सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दिनांक 27 जुलै 2024 रोजी सुट्टी राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. सांगलीत पावसामुळे पुराची भीती निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, आणि कर्मचारीवर्ग यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही सुट्टी कोणत्याही आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी आणि सुरक्षिततेची खबरदारी म्हणून जाहीर केली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -