कोल्हापूर : सकल हिंदू समाजातर्फे (Hindu Community) आज (ता. २३) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी नऊ वाजता हिंदुत्ववादी संघटनांतर्फे महाआरती होईल. सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य घटकांनी व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन संघटनांनी केले आहे.
कोलकत्त्याच्या महिला डॉक्टरवर (Kolkata Doctor Rape Murder) झालेल्या अत्याचारासह हिंदूंचा अवमान होईल, असे कोणी वक्तव्य केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. रिक्षासह शाळा, महाविद्यालये बंद ठेवावीत, असे स्पष्ट केले आहे.
नागाव : जवळच्या नातेवाईकाने १० वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना काल दुपारी उघडकीस आली. संशयित व चिमुकलीचे कुटुंबीय मूळचे बिहारचे असून, कामाच्या निमित्ताने कोल्हापुरात राहण्यास आहेत.
बुधवारी दुपारपासून ती बेपत्ता झाल्याने शोध सुरू होता. शिये-कसबा बावडा (ता. करवीर) राज्य मार्गावरील श्रीरामनगरपासून ८०० मीटरवर शेतात पडलेला तिचा मृतदेह पोलिसांच्या श्वानाने शोधून काढला. या कुटुंबासोबत राहणाऱ्या नात्यातील २५ वर्षीय संशयितानेच हे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
या घटनेच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी (ता. २३) शिये गाव बंद ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच शीतल कदम यांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ तपास करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी केली.