राज्यातल्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा होत असून आता रस्त्यावर इलेक्ट्रिक बसेस धावताना पाहायला मिळत आहेत. आरामदायी आणि जलद प्रवासामुळे या बसेसना प्रवाशांची चांगली पसंती देखील मिळत आहे. कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर असून, आता कोल्हापुरात देखील शंभर इलेक्ट्रिक बसेस धावण्याच्या तयारीत आहेत चला याबद्दल जाणून घेऊया …
9 कोटी रुपयांची मंजुरी
महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये ई बसेसची सेवा सुरू करण्यात आली आहे. लवकरच कोल्हापूरला विजेवर चालणाऱ्या 100 बसेस मिळणार आहेत. याची पूर्वतयारी म्हणून चार्जिंग स्टेशन्स उभारले जात आहेत. राज्य सरकारने त्यासाठी 9 कोटी 86 लाख 96 हजार 637 रुपये मंजूर केल्याची माहिती आहे.
कुठे होणार चार्जिंग स्टेशन?
कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील एसटी कॉलनी आवारात ई बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी स्वतंत्र डेपो आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली आहे. चार्जिंग पॉइंट साठी 11,22 व 33 केव्ही क्षमतेचे उच्च दाबाची वीज जोडणी आवश्यक असते. एका बसला चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तास लागतात पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बस तीनशे किलोमीटरचा टप्पा गाठते.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 10 एसटी स्थानकांमध्ये 50 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांची या इलेक्ट्रिक बसेसला पसंती देखील मिळत आहे. याबाबत माहिती देताना विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितलं की, ई बसेस मिळाव्यात ही आपली खूप दिवसांपासून मागणी आहे 100 बसेस कोल्हापूरला मिळणार आहेत. या बसेसच्या चार्जिंग साठी ताराबाई पार्क इथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या चार्जिंग स्टेशनमध्ये शंभर बसेसच्या चार्जिंगचा नियोजन करण्यात येणार आहे.