Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर १२० कोटी, सांगलीचे साडेतीन हजार कोटींचे नुकसान

कोल्हापूर १२० कोटी, सांगलीचे साडेतीन हजार कोटींचे नुकसान

दर दोन-चार महिन्यांनी येणार्‍या नवनव्या संकटांनी बळीराजाला पार उद्ध्वस्त केले आहे. या आठवड्यात धुवाँधार कोसळलेल्या अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेती आणि शेतकर्‍यांची अपरिमित हानी केली आहे. एकट्या सांगली जिल्ह्याचे 3.5 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सांगलीतील द्राक्षबागा निम्म्यापेक्षा जास्त गारद झाल्या आहेत. कोकणातील शेतकर्‍यांचेही अवकाळीने कंबरडे मोडले असून सुमारे 2.5 हजार कोटींचा फटका येथे बसला आहे. रत्नागिरीत आंबा आणि काजू बागांची हानी झाली असून नुकसानीचा हा आकडा सुमारे 1300 कोटींचा तर सिंधुदुर्गात देवगड हापूसला 600 कोटींचा फटका बसला आहे. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी, डाळिंब आणि द्राक्षबागांना जोरदार तडाखा बसला असून हे नुकसान अंदाजे 1500 कोटींचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भात आणि ज्वारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. साखर हंगामही लांबणीवर पडणार आहे. या जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा 120 कोटींच्या घरात आहे. दै. ‘पुढारी’ टीमने प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकर्‍यांची आजची स्थिती जाणून घेतली असता अत्यंत विदारक चित्र समोर आले. यापूर्वीच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. आता तर हाता-तोंडात आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा आर्त स्वरात विचारतो आहे, ‘हे मायबाप सरकार, सांगा आम्ही आता जगायचं कसं?’

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगडला फटका

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे 5 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. साखर हंगामही चार-पाच दिवस लांबणार आहे. गुर्‍हाळघरेही बंद आहेत. जिल्ह्यात अवकाळीने सुमारे 120 कोटींवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी हिवाळ्यात अशा अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची कुठलीही नोंद नाही.

गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या तीन दिवसांत जिल्ह्यात सरासरी 57.74 मि.मी. पाऊस झाला आहे. डिसेंबर महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणातपाऊस पडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असावी, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात इतक्या पावसाची नोंद यापूर्वी कधीच झालेली नाही.

शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील द्राक्षांचे मोठे नुकसान

जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील द्राक्ष बागांचेही पावसाने मोठे नुकसान केले आहे. सुमारे 25 एकरातील बागा पावसाने उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष बागायदारांचे दोन-तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात भाजीपाल्याच्या शेतीवरही काहीसा परिणाम झाला आहे. शेतात पाणी साचल्याने काढणीसाठी आलेला भाजीपाला शेतातच कुजून गेल्याने जिल्ह्यात भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -