टीम इंडियाकडे टी20 वर्ल्डकपनंतर आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. वनडे वर्ल्डकप 2023 गमावल्यानंतर भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कसर भरून काढली होती. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित चुकलं आहे. आता ही कसर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून काढण्याची रोहित शर्मापुढे संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार आहे. 12 जानेवारीला टीम इंडियाची घोषणा केली जाईल. या संघात कोण असेल याची आतापासून उत्सुकता आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आपल्या आवडीचा संघ निवडला आहे. या संघात त्याने श्रेयस अय्यर संधी दिली आहे. वनडे वर्ल्डकपनंतर श्रेयस अय्यर टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत अय्यरने चांगली कामगिरी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रेयसची संघात निवड केल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलं आहे.
आकाश चोप्राने यूट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘मला वाटतं की या संघात सूर्यकुमार यादव नसेल. खरं तर तो वनडे खेळत नाही आणि विजय हजारे स्पर्धेतही त्याने धावा केल्या नाहीत. दुसरीकडे, संजू सॅमसनही विजय हजारे स्पर्धेत खेळत नाही. तसेच वनडे फॉर्मेटमध्ये त्याची तशी कामगिरी नाही. त्यामुळे या दोघांना संघात स्थान मिळणं कठीण आहे. पण माझ्या संघात श्रेयस अय्यर हे. वनडे वर्ल्डकपपासू आतापर्यंत खेळलेल्या 15 डावात त्याने 2 शतकांसह 112 च्या स्ट्राईक रेटने आणि 52 च्या सरासरीने 620 धावा केल्या होत्या. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत.’
आकाश चोप्राने पुढे सांगितलं की,’माझ्या टीममध्ये शार्दुल ठाकुर नाही. माझ्या संघात जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग आहे. बुमराहबाबत जास्त काही बोलू नये. शमी फिट असेल तर 100 टक्के त्याची जागा संघात आहे. इतकंच काय त्याला इंग्लंडविरुद्धही खेळलं पाहीजे.’
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आकाश चोप्राने निवडलेली टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.