लाडक्या बहिणींनी राज्य सरकारला मालामाल केले. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या तिजोरीवर ताण आला. भावाच्या खिशावर ताण आल्याचे लक्षात येताच बहिणीचा जीव कासावीस झाला. त्यांनी लागलीच हक्कसोड चळवळ राबवली आणि सरकारची तिजोरी पुन्हा भरली. निकषांच्या कुरघोडीमुळे अनेक बहिणी बाद झाल्या. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले. तिजोरीवरील ताण कमी झाला. अजून किती बहिणींना सरकार पुळका येतो, हे लवकरच समोर येईल.
9 लाख बहिणी बाद
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेने एकदम जादू केली. निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही निकष नसलेल्या या योजनेचा राज्यातील कोट्यवधी बहिणींनी लाभ घेतला. खात्यात धडाधड रक्कम जमा झाली. निवडणुकीचे कवित्व संपताच निकषाचा आसूड उगरण्यात आला. निकषाच्या शाळेत अनेक बहिणी अडकल्या. अनेकांनी उगी झंझट नको म्हणून या योजनेला हक्कसोड दिला. हक्कसोड मिळताच सरकारच्या तिजोरीवर आलेला ताण एकदाचा कमी झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील 9 लाख बहिणी या योजनेतून बाद झाल्या.
सरकारचे वाचले 1620 कोटी
निकषाच्या एका निर्णयाने राज्यातील अनेक बहिणींना फटका बसला. निकषाच्या कात्रीत अनेक महिला बाद झाल्या. या योजनेत काही पुरुषांनी पण खाते उघडल्याचे सुरुवातीला निष्पन्न झाले होते. तर काही जणांच्या नावावर अनेक खाती असल्याचे समोर आले होते. त्यानंतर निकषाचा हातोडा मारण्यात आला. या योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आले. तर या योजनने सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याचे उघड झाले. सरकारमधील त्रिमूर्तिनी अर्थातच त्याचा इन्कार केला. आता लाभार्थ्यांसाठी अनेक निकष लावण्यात आले आहेत. या चाळणीमुळे सरकारचे 1620 कोटी वाचले आहेत. 9 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्याने, सरकारच्या 1620 कोटी रुपये वाचले.
2.5 कोटी महिलांना फायदा
ही योजना गेल्यावर्षी जुलै महिन्यात सुरू झाल्यापासून 2.5 कोटी महिलांना फायदा झाला. या योजनेतील महिलांचा वयोगट 30-39 वर्षो वयोगटातील 29 टक्के महिलांचा समावेश, 40-49 गटातील 23.6 टक्के, 50-65 वयोगटातील 22 टक्के, 60-65 वयोगटातील 5 टक्के महिला आहे. आता नवीन निकषांची चर्चा होत आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी चर्चा आहे. योजनेसाठी आधारकार्ड व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे.