Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रपंधरा दिवस आधीच दहावी-बारावीचा निकाल, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीला मिळणार वेळ

पंधरा दिवस आधीच दहावी-बारावीचा निकाल, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीला मिळणार वेळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेच्या १० ते १५ दिवस आधीच घेतल्या आहेत. त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर होणार आहे.

 

बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन सुरू आहे.

 

राज्य मंडळामार्फत दरवर्षी बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातात. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेला सुरवात होते आणि निकाल जाहीर होण्यास साधारणत: तीन महिने लागतात. यामुळे बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो.

 

मात्र, यंदा बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या. परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर केल्याने उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. राज्यातील शिक्षक संघटना दरवर्षी प्रलंबित मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत असतात. त्यामुळे निकाल प्रक्रियेत उशीर होतो. मात्र, यंदा कोणत्याही शिक्षक संघटनेने बहिष्कार न टाकता उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत सुरू केले आहे. त्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

विद्यार्थ्यांना होणार फायदा

 

निकाल वेळेआधी लागल्यास विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. अकरावी, आयटीआय आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांसाठी अधिक वेळ मिळेल. मागील काही वर्षांत दहावी-बारावीचा निकाल उशिरा लागत असल्याने पुढील प्रवेश प्रक्रियांमध्ये अडथळे येत होते. अनेकदा महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होत नसे. मात्र, यंदा ही अडचण दूर होणार आहे.

 

राज्य मंडळाने उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित केली आहे. परीक्षेच्या तारखा लवकर आल्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे नियोजनही आधीपासूनच करण्यात आले होते. शिक्षक संघटनांचे सहकार्य मिळाल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे परीक्षेचा निकाल देखील लवकर लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -