उत्तराखंडमधील हरिद्वारमधून (Haridwar News) फसवणुकीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे एका फसव्याने आपल्या करामतीमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. हा गुंड आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचा खोटा पीए बनून जीवनाचा आनंद घेत होता. या व्यक्तीला उत्तराखंडमधील हरिद्वार पोलिसांनी अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसव्याकडून एक बनावट बीसीसीआय कार्डही जप्त करण्यात आले आहे. या हाय-प्रोफाइल फसवणूक प्रकरणाची माहिती पोलिसांनी स्वतः दिली. आरोपीचे नाव अमरिंदर सिंग असे आहे.
आरोपी गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शाह यांचा पीए असल्याचे भासवून हरिद्वारमधील एका हॉटेलमध्ये मज्जा मस्ती करत होता. आरोपी अमरिंदर हा पंजाबमधील फिरोजपूरचा रहिवासी आहे. आरोपी फसवणूक करून हॉटेलमधील मुक्काम आणि इतर सुविधांचा आनंद घेत होता.
जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, आरोपीकडून एक बनावट बीसीसीआय ओळखपत्र देखील जप्त करण्यात आले आहे. त्या कार्डवर जय शाह आणि अमरिंदर यांचेही फोटो होते. आरोपी हॉटेलमध्ये अनेक बेकायदेशीर मागण्या करत होता. याशिवाय तो संशयास्पद बैठकाही घेत होता. हॉटेल कर्मचाऱ्यांना आरोपीवर संशय आला. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिस चौकशीनंतर तो माणूस फसवणूक करणारा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
हरिद्वार पोलिसांनी काय म्हटले?
आयसीसी अध्यक्षांचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या हरिद्वारमधील एका हॉटेलमध्ये राहणाऱ्या आरोपी अमरिंदर सिंगला खारखरी परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हॉटेलचे रिसेप्शनिस्ट विशाल पोखरियाल यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अमरिंदरविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याचाही तपास केला जात आहे. सध्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
गेल्या वर्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जय शाह यांनी 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यापूर्वी ते बीसीसीआयचे सचिव म्हणून काम करत होते.