Friday, November 22, 2024
Homeसांगलीसांगलीत ‘अन्न-औषध’च्या कारवाया थंडावल्या! बेकरी, हॉटेल, दुकानदारांकडून नियम धाब्यावर

सांगलीत ‘अन्न-औषध’च्या कारवाया थंडावल्या! बेकरी, हॉटेल, दुकानदारांकडून नियम धाब्यावर

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, बेकरी, दुकानदार, खाद्यपदार्थ उत्पादक आणि दूध विक्रेते यांच्याकडून नियम धाब्यावर बसवत मनमानी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचा धोका आहे.

शहरासह जिल्ह्यात विविध खाद्यपदार्थ तयार करणारे, दुकाने, हॉटेल यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कोरोना संसर्गाच्या काळापासून लोक खाद्यपदार्थ, आरोग्य याबाबतीत खूपच दक्ष झाले आहेत. आजारी पडू नये यासाठी ताजे व चांगले पदार्थ खाण्यावर लोकांचा भर आहे. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सप्टेंबरपासूनच तपासणीची मोहीम सुरू केली होती. खाद्यपदार्थ उत्पादक कारखाने, तेल निर्मिती कारखाने, हॉटेल, बेकरी यांच्यावर धाडी टाकण्याची मोहीम उघडण्यात आली होती. त्यामध्ये अनेकांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याप्रकरणी काही जणांकडे जप्त नमुन्यांमध्ये भेसळ दिसून आल्याने त्यांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.

मात्र दसरा, दिवाळी संपल्यानंतर या विभागामार्फत फारशी कारवाई झालेली दिसून येत नाही. कोणत्याही प्रकारची तपासणीच नसल्याने बेकरी, हॉटेल, दुकानचालक, विविध खाद्यपदार्थ उत्पादकही बिनधास्त झाले आहेत. अनेक बेकरींमध्ये विक्री होत असलेल्या उत्पादनांवर उत्पादन, एक्स्पायरीची तारीख दिसून येत नाही. त्यांना विचारले तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. हॉटेल, बेकरीत अनेक कर्मचारी
मास्कचाही वापर करीत नाहीत. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणीत आणि कारवाईत सातत्य ठेवावे, अशी लोकांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -