काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी (SSC) आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्या आहेत. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. दहावीची बोर्ड परीक्षा मार्च महिन्यात संपली आहे. आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही निकालाची प्रतीक्षा असून दहावीचा निकाल नेमका कधी लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
मागील काही वर्षांत एसएससी आणि एचएससी परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदा दहावीचा निकाल 15 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. एसएससी परीक्षेचा हा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल असेल, असे म्हटले जात आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर केले आणि या परीक्षांचा निकालही मे महिन्यातच जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर एसससी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
दहावीच्या परीक्षेत 89 गैर प्रकारांची नोंद
दरम्यान, राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली आहे. या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते . राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या परिसरात जिल्हा प्रशासनाकडून ड्रोनद्वारे परीक्षा केंद्रांची निगराणी, परीक्षा केंद्रांबाहेर दृक् श्राव्य चित्रीकरण, सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके, बैठ्या पथकांची नियुक्ती, परीक्षा केंद्रावर नियुक्त केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची ‘चेहरा पडताळणी व्यवस्थे’द्वारे (फेस रेगक्निशन) तपासणी, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, अशा विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, गैरप्रकार घडणाऱ्या शाळा, महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89, तर बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे.