गाडी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून युवकावर काठी व लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला. सदरची घटना सोमवारी रात्री उशिरा जवाहर नगर परिसरातील अक्षय बार हॉटेल समोर घडली.
या प्रकरणी वैभव गणेश कडलीमट्टी (वय २९) इमरान फारूक कलेगार (वय २५) व दक्ष शंकर वडर (वय १८, तिघेही रा. जवाहरनगर) यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रफुल्ल सुनील जाधव (वय ३२, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी प्रफुल्ल जाधव यांचा मित्र आसिफ मुजावर याने त्यांच्याकडून मोटरसायकल घेतली होती. बराच वेळ उलटूनही आसिफ मोटरसायकल घेऊन न परतल्याने प्रफुल्ल त्याचा शोध घेत अक्षय बार हॉटेल समोर गेले. त्याचवेळी तेथे थांबलेल्या वैभव कडलीमट्टी याने ‘तू आसिफला गाडी का दिलीस?’ असे विचारून, अचानक हातातील लाकडी काठीने प्रफुल्ल यांच्या उजव्या डोळ्याखाली मारहाण केली. यावेळी वैभवसोबत असलेले इम्रान कलेगार आणि दक्ष वडर या दोघांनी प्रफुल्ल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात प्रफुल्ल जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तिघा संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींना घटनास्थळी तपासासाठी फिरवण्यात आले.