महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या आज (दि.२२) बदल्या जाहीर करण्यात आल्या. राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर योगेश गुप्ता यांची कोल्हापूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
योगेश गुप्ता नांदेडहून कोल्हापूरात
महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची निर्दिष्ट पदावर प्रशासकीय कारणास्तव बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कोल्हापूरचे नवीन पोलिस अधिक्षक म्हणून योगेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते नांदेडमध्ये पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण या पदावर कार्यरत होते.
सांगली पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिवला बदली
धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे. माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना अद्याप नवीन नियुक्ती मिळालेली नाही. पण त्यांना स्वतंत्रपणे नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. याचबरोबर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर अस्लम शेख यांची देखील बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.